प्रा.किशोर पाटील यांना आर्थिक मदतीचे आवाहन


दानशूरांनी दखल घेतल्यास वाचू शकतो एक संसार..!

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील करणखेडा हे गाव.या गावचे प्रा.किशोर निंबा पाटील.वय ४०.आठराविश्व दारिद्र्य असणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला.वडील श्री निंबा चिंधा पाटील व आई तुळसाबाई निंबा पाटील.. आईवडील शेतमजूर.स्वतःच्या मालकीचा हातभरसुद्धा शेताचा तुकडा नाही.दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी केल्याशिवाय हातातोंडाची गाठ पडायची नाही. प्रसंगी वडील रस्त्याच्या कामाला जायचे.पोटाला चार लेकरं..तीन मुली आणि मग किशोरजी.हातावरची पोटं..अशा हलाखीच्या परिस्थितीत किशोरजींचे शिक्षण सुरू झाले.या गरिबीचा पांग फिटायचा असेल तर लेकराला शिक्षक बनवायचं हे आईवडिलांचे स्वप्न.हाताच्या कष्टावर लेकरांची शाळा- शिक्षण सुरू झालं..किशोरजी ही शाळेत कुशाग्र बुद्धीमतेचा हुशार विद्यार्थी व संवेदनशील मनाचे असल्याने परिस्थितीची जाणीव ठेवून प्रामाणिकपणे शिकत गेले.बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि पुढे मुळचीच गरिबी त्यात तीन मुलींची लग्नं यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली.घरच्या अशा हलाखीच्या परिस्थितीमुळे किशोरजींचे शिक्षण सुटले आणि हाती काम धरावे लागले.सुरतच्या कापड मिलमध्ये बारा तासांची ड्युटी करून येणाऱ्या पगारातून स्वतःचा खर्च भागवत घरखर्चाला हातभार लावू लागले..या काळात शिक्षणात खंड पडत गेला तो जवळजवळ तीन वर्षे.त्यानंतर मारवाड येथे कला महाविद्यालय सुरू झाल्याची बातमी मिळाली. आणि मनात असलेली शिक्षणाची आस पुन्हा जागृत झाली. तब्बल तीन वर्षांच्या खंडांतर २००१ साली बी.ए पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला. आणि मग काम करत शिक्षणाचा खंडित प्रवास पुन्हा सुरू झाला.                   
पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना एक फार मोठ्या दुःखद घटनेतून किशोरजींच्या कुटुंबाला जावे लागले.वयाच्या पन्नाशीनंतर वडिलांना दिसायचे पूर्णपणे कमी आले होते आणि आता तर वडील अंधरुणाला खिळून होते.रात्रीपासून मायेचा गोतावळा त्यांच्या उशाला बसून होता आणि दुसऱ्या दिवशी किशोरजींचा २ ते ५ या वेळेत इंग्रजी विषयाचा पेपर होता... एकीकडे मरणासन्न अवस्थेतील बाप आणि दुसरीकडे पदवीच्या शेवटच्या वर्षाचा इंग्रजी पेपर...अशा द्विसंकटात सापडलेल्या किशोरजींची नियती इथे वेगळीच परीक्षा घेत होती.अखेर दुपारी १:१० वाजता वडिलांची प्राणज्योत मालवली.लेकराला शिक्षक होण्याचे स्वप्न बघणारा बापाने कायमचे डोळे मिटले.पुढे जावं की माग थांबावं अशी परिस्थिती... दुःखाचा डोंगर कोसळलेला.पण थांबून चालणार नव्हतं.बापानं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं होतं.बापाचे डोळे मिटले होते पण डोळ्यातल स्वप्न बाप मागे ठेऊन गेला होता. ..दुःखाला आवर घातला आणि बापाच्या पायांवर अश्रूंचा अभिषेक घालून त्यांचा आशीर्वाद घेऊन किशोरजी बाहेर पडले...बापाचा निर्जीव देह मागे ठेऊन परीक्षेला सामोरे गेले...दुःखभरीत अंतःकरणाने आणि ओथंबलेल्या साश्रुपूर्ण नयनांनी पुढ्यातला पेपर सोडवला आणि घरी जाऊन मग बापाच्या अत्यंविधीचे सोपस्कार पार पाडले.त्यानंतर सलग पाच दिवस पेपर होते पण सहृदयी प्राध्यापकांनी दिलेला मोलाचा आधार यावर सगळे तरून गेले.
पुढे एम.ए ला प्रवेश घेतला.मारवाड महाविद्यालयात अभ्यासाची सोय झाली.ओळखीच्या प्राध्यापकांची प्रेरणा मिळत गेली.एम. ए. पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने किशोरजींची गुणवत्ता पाहून त्यांची शिक्षकपदी नेमणूक केली.तरीही नियमित अभ्यास सुरू होता.आणि दि.२८/०६/२००९ रोजी विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट)परीक्षेत उत्तीर्ण झाले.महाविद्यालयाचा पहिल्या बॅचचा विद्यार्थ्याने महाविद्यालयात नेट उत्तीर्ण होण्याचा पहिला विद्यार्थी होण्याचमान मिळवला.गरिबीच्या शिरपेचात यशाचा पहीला तुरा खोवला...आईवडिलांच्या कष्टाचे हे पहिलेवहिले चीज होते..वडिलांचे प्राथमिक शिक्षक बनवण्याचे स्वप्न पण किशोरजींनी परिस्थितीवर मात करत त्याच्याही पुढे मजल मारत प्राध्यापक पदाचे उज्वल यश संपादन केले.वाटलं आता परिस्थिती कुस बदलेल.. पूर्ण घरादाराला आनंद झाला.आठराविश्व दारिद्रीपणाच्या अवस्थेला सुखस्वप्ने खुणावू लागली...त्यानंतर बिकट संघर्षातून शिक्षणातील हे उचित ध्येय गाठल्याबद्दल सकाळ वृत्तपत्राने किशोरजी यांची दखल घेऊन यशोगाथा या सदरात 'शिक्षणाची बिकट वाट तुडवताना' या शीर्षकाखाली किशोरजींची संघर्षामय प्रवास मांडला होता.पुढे महाविद्यालयातील प्राध्यापकाच्या नोकरीचा आनंद जास्त काळ टिकला नाही कारण ही प्राध्यापकाची नोकरी म्हणजे एक  किशोरजींच्या आजपर्यंतच्या आयुष्यात मृगजळ बनून राहिली आहे.
मारवड ,ता.अमळनेर जि.जळगाव येथील वरिष्ठ  महाविद्यालयात विद्यापीठाचे दि.२४/०१/२०११ पासून  सहा.प्राध्यापक पदाची कायमस्वरूपी मान्यता आहे.पण १००% अनुदानित असणाऱ्या महाविद्यालयात किशोरजींच्या पदाला शासनाने अनुदान मंजूर केलेले नाही.विशेष म्हणजे असेच प्रकरण असणाऱ्या दोन महाविद्यालयांना त्या काळात शासनाने अनुदान मंजूर केले पण किशोरजी यांना न्याय मिळाला नाही.म्हणून सेम केस म्हणून औरंगाबाद उच्च न्यायालयात केस दाखल केली आहे.(केस नं-6627/2019) ऍड. मिलिंद पाटील हे वकील केस लढत आहेत.
१८/०५/२०११ साली किशोरजी विवाहबद्ध झाले.पत्नी सुवर्णा व सध्या ७ वर्षाचा असणारा मुलगा पारस.आईस धरून आता चौघाजणांच्या कुटुंबाची जबाबदारी किशोरजींवर.महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी पण १ रुपयेही वेतन नाही.दोन वेळच्या पोटच्या भुकेची भ्रांत तरी मिटली पाहिजे यासाठी... किशोरजी आपले अध्यापनाचे कार्य करून बाकीच्या वेळेत कुठेतरी मजुरीचे काम करत कसेतरी घर चालवत.म्हणजे रात्रंदिवस आम्हां युद्धाचा प्रसंग...यासारखीच सगळी परिस्थिती.येणार प्रत्येक दिवस सारखाच घरची स्थिती आहे तशीच.गरिबी अजूनही ठाण मांडून होतीच.आज १० वर्षे झाली विनावेतन काम करताना घनघोर संकटांना तोंड देत..दुःखाचा भार पेलत आहे त्या परिस्थितीत मिळणाऱ्या तुटपुंज्या मिळकतीत समाधानाने दिवस जात होते पण नियतीला हे मान्य नव्हतं.
 २०१८ सालच्या जून- जुलै महिन्यात किशोरजींना मळमळ,उलटी,चक्कर येणे,तीव्र ताप असे त्रास सुरू झाले त्यामुळे उपचारासाठी औरंगाबाद येथे दवाखान्यात दाखल केले असताना तेथे त्यांच्या तपासणीअंती दोन्हींही किडण्या निकामी झाल्याचे निदान झाले.आणि एक मोठा धक्का किशोरजींसह साऱ्या कुटुंबाला बसला.पायाखालची जमीन सरकली.एक तर आगोदरच परिस्थिती नाजूक आणि त्यात हे भलेमोठे आजारपण.प्रथम औरंगाबादमधील 'महात्मा गांधी मिशन' (MGM) हॉस्पिटलमध्ये डायलिसिस सुरू झाले व त्यानंतर 'युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये'किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचे ठरले.पण अनेक यक्ष प्रश्न उभा उपचाराचा खर्च जवळपास १२ लाख येणार होता..एका विनाअनुदानित शिक्षकाचे गरीब कुटूंब.दररोज १०० रुपयांच्या नोटेचं तोंड बघण्यासाठी हरेक प्रकारची कामे करावी लागायची....आणि आता एवढा मोठा पैशांचा डोंगर कसा उभा करायचा..? पण काहीपण उलाढाल करणे गरजेचेच होते...आणि मग घरात असणारे लग्नातले सर्व दागिने विकले, सासरची मंडळी,नात्यांचा गोतावळा मदतीसाठी धावला...समाजातील दानशूर लोक...अमळनेरच्या हिंदी अध्यापक मंडळाकडून आर्थिक मदत झाली...किशोरजींचे मित्र भैय्या पाटील यांनी व्हाट्सएपच्या माध्यमातून एक ग्रुप तयार करून मित्र परिवाराकडून मदत गोळा केली..अमळनेरच्या एस.टी आगारातील कर्मचारांनी मदतीचा हात पुढे केला...इतर महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आपल्या शिक्षक बंधुसाठी मदत देऊ केली....आणि विशेष म्हणजे...ज्या किशोरजींनी १ रुपयाचे वेतन न घेता ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून जे संस्कारक्षम विद्यार्थी घडवले..त्यापैकीच एक या महाविद्यालयाची कर्तृत्ववान विद्यार्थीनी कु.रुचिता चौधरी या विद्यार्थीनीने  स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन आपल्या कॉलेजमध्ये या गुरूला मदत करण्यासाठी वातावरण निर्माण केले..
  कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन आपल्या गुरूंच्या अशा कठीण परिस्थितीत आधार देण्यासाठी हाती कटोरा घेतला अमळनेर शहरच्या गल्लोगल्लीतुन सकाळपासून संध्याकाळपर्यंत मिळेल एक-दोन रुपये,दहा-वीस रुपये जमा करू लागले.आपल्या गुरूंच्यासाठी हाती झोळी घेऊन मदत गोळा केली...अमळनेर शहरातल्या एका रस्त्यावरच्या भिकाऱ्यानेसुद्धा आपल्या भिकेतील रुपये या मदतीसाठीच्या झोळीत टाकले...एकीकडे कॉलेज जीवनात पैसे उधळणारे,चैनी करणारे तरुण कुठे आणि दुसरीकडे आपल्या गुरुसाठी पै-पै गोळा करणारे हे विद्यार्थी कुठे..?खरंच नव्या पिढीची या समाजाला आवश्यक आहे...१ रु वेतन न घेता ज्या गुरूंनी ज्ञानदान केले..त्या गुरूंच्या कठीणप्रसंगात त्यांच्या  शिष्यांनी आपले कर्तव्य म्हणून आपले योगदान दिले आधुनिक एकलव्यांच्या या फौजेची आपल्या गुरुसाठी चाललेली धडपड पाहून अनेकांचे डोळे पाणावले...अनेक दानशूरवंत ही तळमळ पाहून मदतीसाठी पुढे आले.एखाद्या चांगल्या माणसांवर संकट येते त्यावेळी अशा अनेक सहृदयी माणसांची मांदियाळी हृदयापासून मदतीसाठी झेपावते...आमचा रस्त्यावरचा भिकारीही इतका उदार व श्रीमंत मनाचा जी ज्याला देण्यातला भाव कळला आहे...आपल्या माऊलींनी उभ्या महाराष्ट्राला संस्कार दिला
 "अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्हीं लोक"   ही अवघी माऊलींची लेकरं आहेत म्हणून तर किशोरजींच्या दुःखासमयी त्यांचा संसार सुखाचा होण्यासाठी झटली.अशा माणसांच्या धडपडीतून एवढी मोठी पैशांची रक्कम उभा राहिली..अशावेळी माणसांचे प्रकारही पहायला मिळाले.. काही धडपडणारी आणि काही लांबून बघणारी. "अवघाची संसार एकट्याचाच करीन दुसऱ्यांच्या दुःखाकडे नुसता पहातच राहीन" अशा वृत्तीची माणसं... अशा वृत्तीच्या माणसांच्याकडून काय अपेक्षा ठेवावी...?           
                                         किडनी दान कोण करणार..? ती वेळेवर मिळेल का.? ती शरीराला जुळणार का..? अशा असंख्य प्रश्नांचे वारूळ मनात होते..आणि अर्थात शेवटी जन्मदाती आई तयार होतीच.ती स्वतःची किडणी देण्यास सरसावली.दोन महिन्यांच्या कालावधीत दोघांच्या तपासण्या व शासनाच्या सर्व अटींची पूर्तता करून...५ सप्टेंबर २०१८ रोजी आईच्या किडणीचे किशोजींच्या शरीरात प्रत्यारोपण केले गेले त्यावेळी मारवड गावचे थोर सुपुत्र आणि औरंगाबादचे तत्कालीन अप्पर आयुक्त 'हम होंगे कामयाब' आणि 'धडपडणाऱ्या तरूणाईसाठी' या दोन पुस्तकाच्या माध्यमातून प्रत्येक युवकांच्या हृदयापर्यंत पोहोचलेले प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व श्री संदीपकुमार साळुंखे साहेब यांनी ,किशोरजींच्या परिस्थितीची दखल घेत जातिनिशी लक्ष घातले...हॉस्पिटलमधील डॉक्टरांना सूचना करून साहेबांनी सर्वतोपरी मदत केली ,एवढे मोठे उच्च पदस्थ अधिकारी असून साहेबांनी सिग्मा हॉस्पिटलमध्ये किशोरजींना सोबत घेऊन सर्व तपासण्या करून घेतल्या.किशोरजींच्या किडणी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होत असताना साहेब ऑपरेशन थिएटरच्या बाहेर थांबून सौ - सुवर्णाताई व नातेवाईकांना धीर देत होते.उपचाराचे ते वेळोवेळी माहिती घेत होते.ज्या.अगदी घरच्या व्यक्तीसारखी ते काळजी वाहत होते...अशांना म्हणतात जमीनीवर राहून आकाशाला टेकलेली माणसे.सामान्यातल असामान्यत्व. किशोरजींच्या या आजारपणात साळुंखे साहेबांचे मोठे योगदान आहे..म्हणून तर आज किशोरजींच्या हृदयातले त्यांचे अढळ स्थान किशोरजींच्या व्हाट्सएपच्या डी. पी त प्रतिकरूपाने सदैव झळकत असते.
                                शस्त्रक्रिया यशस्वी झाली.बापानं शिक्षक होण्याचं स्वप्न बघणाऱ्या लेकराला त्या ६४ वर्षीय आईने स्वतःची किडनी देऊन शिक्षकदिनाच्या दिवशीच पोटच्या गोळ्याला पुन्हा एकदा पुनर्जन्म दिला...जीव तरी वाचला पण शस्त्रक्रिया, औषधोपचार आणि हॉस्पिटलमध्ये ४ महिने ऍडमिट व्हावे लागले याचा खर्च सुमारे १२ लाखाच्या घरात गेला.घरचा कर्ता सवरता पुरुष असा रुग्णशयेवर...एकीकडे पती आणि दुसऱ्या बाजूला सासूबाई अशात सुवर्णाताई सगळं बळ एकवटून येणाऱ्या परिस्थितीशी झुंज देत होत्या...  वेगवेगळे विलक्षण वाईट अनुभव येत होते कधी कधी डायलिसिस सुरू असताना भयानक थंडी वाजून यायची या त्रासाने जगणे नकोसे वाटायचे डायलिसिस सुरू असणाऱ्या कॉटशेजारी पत्नी सुवर्णा बसून असायच्या किशोरजींना होणारा त्रास पाहून त्यांना रडू कोसळायचे त्यांची या आजारातून सुटका व्हावेत पुन्हा घराचा आधार मजबूत व्हावा यासाठी त्यांची नित्य धडपड असायचीअनेक मायेची माणसं धीर देत होती... पण त्यांना त्यावेळी दवाखान्यात असताना आलेला असाही अनुभव  त्या आज सांगतात...की पती खाटेवर असताना,जगण्याचा एवढा मोठा  संघर्ष सुरू असताना पण काही माणसांचे वाईट अनुभव सुवर्णाताईसह नातेवाईकांना आले.ते आजही मनाला चटका लावून जातात.तर अशा विघातक लोकांनी असे सल्ले दिले की,किशोरजींच्याबाबतीत खुद्द सुवर्णा व नातेवाईकांची मानसिकता बदलण्याचाच प्रयत्न केला.आता त्यांच्या दोन्हीं किडण्या निकामी झाल्या आहेत ते काही पुन्हा उठून उभा राहू शकणार नाही,त्यांच्याकडे ना घर ना शेती आहे ,तुम्ही याच्यामध्ये जीव का अडकवता ? हा पहिल्यासारखा मेहनत करू शकणार नाही ,कशाला त्यांना जगवण्याची धडपड करीत आहात? असे काही सल्ले या विकृतांनी दिले होते सुवर्णाताई काहीच बोलल्या नाहीत आधीच आलेल्या प्रसंगाने मनोमन हादरून गेलेल्या आणि आताच्या अशा माणसांच्या बोलण्याने थिजून गेल्या होत्या...
                                 जखमेवर त्या माणसांनी पद्धतशीरपणे मीठ शिंपल जात होतं...सुवर्णाताई खाटेवर असणाऱ्या आपल्या पतीच्या पायाशेजारी भरल्या डोळ्यांनी मनातल्या या दुःखाला दूर सारायच्या.त्या माणसांची काही चूक नाही...कारण त्यांना त्यांच्या आयुष्यात आपल्या आई-बहीणीला कधी ओळखता आले नसावे.कारण त्या सुवर्णाताईंच्या ठिकाणी जर त्यांची आई किंवा बहीण असती तर तो सल्ला त्यांनी असा सल्ला दिला असता का..? असं म्हटलं जातं स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते...या सुवर्णताईनी किशोरजींच्या या आजारपणात एक आई होऊन त्यांची सेवा केली..आजची आमची सावित्री सुवर्णाताईनी त्या विकृतीला इथल्या मातीतल्या पत्नीची संस्कृती दाखवून दिलीय.की पतीच्या अशा कठीण काळात त्याची पत्नीचं सर्वस्व होऊन सारा भार वाहते...तिला ते कष्ट वाटत नाहीत तर ती कर्तव्य मानते.पतीची सेवा करणं हा तर तिच्यातल्या स्त्रीपणाचा तो संस्कार आहे.सुवर्णाताई रणरागिनी सारख्या लढल्या-झगडल्या .यमाच्या दारातून आपल्या पतीला परत आणणाऱ्या त्या एक आधुनिक सावित्रीच होत्या,आज किशोरजी परमेश्वराचे शतशः आभार मानतात की सुवर्ण गुणांची सुवर्णा अर्धांगिनी म्हणून लाभली.
                                     जन्मदात्री आणि आताची जीवनदात्री मातोश्रीने दिलेले अवयवदान, धैर्याने साथ देणारी सखी सावित्री सुवर्णाताई,मायाममतेचा गणगोत,असंख्य काळजीवाहू लोक,दानशूरवंत,आणि शिष्यगण या सर्वांच्या शुभकामना,शुभाशीर्वाद,  आणि मदतीच्या योगदानातून किशोरजी या दिव्य संकटकाळातून बाहेर पडले...निकराची झुंज देऊन अखेर त्यांनी मृत्यूवर विजय मिळवला.पण आता पुढे स्वतःला अत्यंत जपावे लागणार होते.वर्षभर घरामध्ये स्वतंत्रप खोलीत राहण्याची व्यवस्था करावी लागली.जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून अधिकची काळजी...बाहेरच्या माणसांना भेटणे दुरापास्तच... तोंडाला फडके बांधून स्वतंत्र खोलीत स्वतःला जपण्याचे किशोरजींचे व्रत सुरू होते एक वर्षापर्यंत.आणि आताच्या २०१९ च्या शैक्षणिक वर्षांपासून त्यांनी कॉलेजला जाण्यास सुरुवात केली आहे.उपचारांचा एवढा मोठा खर्च...एवढी मोठी शस्त्रक्रिया होऊन देखील दवाखाना काही सुटलेला नाही. आजही दर महिन्याकाठी दवाखान्याची पायरी चढावी लागते...गावापासून औरंगाबादला पत्नीसह जाण्यायेण्याचा १५०० रु खर्च येतो.दवाखान्यातील तपासणी, औषधोपचार असे एकूण महिन्याकाठी १०,००० खर्च येतो...आर्थिक ताळमेळ कसा बसवायचा..? तेच कळत नाही.सगळी हतबलता पदरी उरते. काहीवेळा सुवर्णताईंना दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरीला गेल्याशिवाय पर्याय उरत नाही...आईंचे कष्टणारे हातदेखील आजपर्यंत राबले पण आता त्यांना वार्धक्यामुळे काम जमत नाही.घरात एका ठिकाणी बसून असतात..सासरकडची मंडळी थोर मनाची आजतागायत धनधान्य,लागणाऱ्या गोष्टी पुरवतात...कमी जास्तीला तेच खंबीरपणे उभे राहतात.७ वर्षांचा मुलगा आहे पारस.काहीवेळा या लेकराला हौसेने केलेलं सोनं ही विकावं लागलं त्यावेळी कुठे दवाखान्याची पायरी चढता आली.
                                   अलीकडे एक निवृत्त झालेले वायरमन वार्धक्याकडे झुकलेले. किशोरजींचा पत्ता शोधत त्यांच्या गावी आले आणि त्यांच्या हाती औषधोपचारासाठी पाच हजार सोपवून परतले.सुवर्णाताईंनी ते देव्हाऱ्यावर ठेवलेत...जणू त्या देवांबरोबर त्या देवमाणसाने दिलेल्या त्या लक्ष्मीलाही पूजताहेत...त्या माणसातल्या देवाला शतशः प्रणाम करताहेत...तो थोर मनाचा कनवाळू...घराचा करता धरता सुखरूप रहावा यासाठी त्या पैशांच्या रूपातून आशीर्वाद देणारा....असे माणसातले अनेक देव या काळात मदतीला धावले.
                                   अशी सारी विदारक स्थिती आहे किशोर पाटील यांची. एका१००% अनुदानित महाविद्यालयात प्राध्यापक पदावर गेली १० वर्षे विनावेतन अध्यापनाचे काम करणारा प्रामाणिक प्राध्यापक. आज विनाअनुदानित पदावर काम करताना या थराला येऊन पोहोचला...गेली १० वर्षे १ रु.पगार न घेता प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे काम केले त्याचे हेच फळ मिळाले का..? ज्या आईवडिलांनी टोकाच्या गरीबीतून पोराला शिक्षक बनवण्याचं स्वप्न बघितलं..ते चुकलं का..?  की या शासनाच्या अनास्थेमुळेच आज किशोरजींच्यावर ही परिस्थिती ओढवली.. या सरकारने अनुदान देण्याची जबाबदारी झटकून नेमकं काय केलं..? गेली वीस वर्षे विनाअनुदानितचा प्रश्न तसाच अनुत्तरित ठेऊन अशा कित्येक जीवांशी या सरकारने खेळ मांडलाय.गरीबाघरची पोरं प्रामाणिकपणे शिकून गरिबाला परवडेल अशी नोकरी म्हणून शिक्षकी पेशात येताहेत आजना उद्या पगार सुरू होईल या आशेवर विनाअनुदानित तत्वावर कित्येक वर्षे विनावेतन काम करताहेत.पण या सरकारने अक्षरशः त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी केली आहे. विनाअनुदानितच्या धोरणाने कित्येकांची आयुष्य उध्वस्त झाली.शेवटी या भणंग जगण्याला विटून काही विनाअनुदानित शिक्षक आत्महत्येसारखा पर्याय शोधत आहेत. कित्येकजण या व्यवस्थेचा बळी ठरले आहेत..आज महाराष्ट्रात एका गुरूंच्या उपचारासाठी त्यांच्या शिष्यांना हातात कटोरा घेऊन भीक मागावी लागते इतकी वाईट परिस्थिती या राज्यात विनाअनुदानित शिक्षकांच्यावर आली आहे की स्वतःच्या उपचाराचा खर्च ते करू शकत नाहीत..याहून शिक्षणक्षेत्राला लाजिरवाणी गोष्ट कोणती असावी...?
                                          आपल्या संस्कृतीत गुरु परमात्मा परेशू असं स्थान असणाऱ्या गुरुविषयी विद्यार्थ्यांच्या मनात जागलेल्या त्या संवेदना या सरकारच्या हृदयात कधी जागृत होणार..?किशोर पाटील हे एक उदाहरण झाले.अशी कित्येक उदाहरणे सांगता येतील महाराष्ट्रातील जी अत्यंत विदारक आहेत.या सरकारकच्या अशा नाकर्तेपणाच्या धोरणामुळे आज  गरिबांची घरे दानीला जात आहेत.म्हणजे एकीकडे सांगितले जाते...गरिबीला उलथून टाकायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही..मग इथे गरिबीतून शिक्षण घेऊन शिक्षक झालेल्या विनाअनुदानित शिक्षकांवर शेवटी आत्महत्या करायची वेळ येते मग ती गरिबी दूर होण्याचे सोडाच तर ते घरंच उध्वस्त होते.? मग एवढे शिक्षण घेऊन शिक्षक होऊन काय फायद्याचे झाले..?आज महाराष्ट्रात  विनाअनुदान तत्वावर काम करणारे असे कित्येक किशोर पाटील आहेत जे खितपत जीवन कंठत आहेत..?स्वतःच्या दुखण्यावर खर्च करण्याचीही ऐपत राहिली नाही. किशोर पाटील सारख्या प्राध्यापकावर अशी वेळ का यावी..? खरं तर त्यांच्या आताच्या या परिस्थितीला एकमेव हे शासन जबाबदार आहे...शासनाच्या विनाअनुदानित धोरणाचा बळी ठरणाऱ्या किशोरजींना समाजामधल्या माणसांचा चांगुलपणाने वाचवलं... मग हा चांगुलपणा या सरकारी व्यवस्थेच्या माणसांच्या मनात कधी निर्माण होणार..? आज रस्त्यावरचा आमचा एक भिकारी या विनाअनुदानित शिक्षकाच्या आजारपणात आपल्या झोळीतील भीक दान म्हणून देतो...आमच्या रस्त्यावरच्या भिकाऱ्यापाशी जर एवढी दानत आहे.पण दान म्हणून नव्हे... गेली कित्येक वर्षे काम करणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांच्या हक्काचा पगार या सरकारला का देता येत नाही..? शासनकर्ते तुम्हीं ही माणूसच आहात ना..?मग.तुम्हांला कसे हो हे माणसांचे जगणे कळत नाही..?पत्येकाला पोट आहे...घरदार आहे...आईवडील.. पत्नी-मुले असे कुटूंब जगवायचे...बाकी काही नको पण अन्न, वस्त्र,निवारा,शिक्षण,आरोग्य या मूलभूत  गरजा त्यांनी आजच्या परिस्थितीत कशा भागवायच्या..?
                                     पण२० वर्षात १५० पेक्षा जास्त विनाअनुदानितची आंदोलने होऊनही शासनाने अखेर न्याय दिला नाही.मग वेदनेने विव्हळणाऱ्या एखाद्या किशोर पाटील सारख्या विनाअनुदानित शिक्षकाचा हुंकार या असंवेदनशील सरकारला कसा ऐकू येणार म्हणून या अपेक्षाहीन सरकारकडे दाद न मागता शेवटची आशा म्हणून भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या दरबारी आता किशोर पाटील आपल्या जगण्याचा न्याय मागणार आहेत.दुसरी आंतरीक कळकळीची विनंती त्या औरंगाबाद उच्च न्यायालय न्यायदेवतेला की,किशोर पाटील यांच्या केसचा लवकरात लवकर निकाल लावून .माणूस म्हणुन जगण्याचा न्याय मागणाऱ्या किशोरजीनाच नाही तर ज्या गरीब पित्याने लेकराला शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिले..त्या स्वर्गवासी बापाला  ज्या माऊलीने स्वतःची किडनी देऊन लेकराला पुनर्जन्म दिला त्या मातेला...अनंत अडचणींच्या काळात जिने धैर्याने सामना करत पतीला साथ दिली त्या पत्नीला आणि हसत्या खेळत्या नव्यानं फुलणाऱ्या त्या निरागस मुलाकडे एकदा पाहून त्या न्यायालयाने न्याय द्यावा हीच याचना आपल्या न्यायदरबारी...
                                       आजही किशोरजी या आजारपणातून सावरलेले नाहीत... महिन्याकाठी दवाखान्याची पायरी चढावी लागते..औरंगाबाद जाण्याचा येण्याचा एका फेरीचा खर्चच १५०० रुपये आहे. दवाखान्यातील तेथील नवीन तपासण्या, औषधोपचार यावर महिन्याला जवळपास १०,००० खर्च ठरलेला आहे.उत्पन्नाचे दुसरे कुठलेच साधन नाही...अशा परिस्थितीत हा खर्च कसा भागवायचा..?हा प्रश्न रोज छळतो आहे.समाजातील आपल्या दानशूर बांधवांनी  किशोरजींना उपचारादरम्यान मदत देऊन आपली बांधीलकी पार पाडली आहे...आता आपली जबाबदारी आहे.महाराष्ट्रातील तमाम माझ्या सहृदयी माणसांना..शिक्षक बांधवांना आवाहन आहे.आपणही या आपल्या बंधुसाठी पुढे येऊया... मदतीचा एक हात देऊन सध्याच्या त्यांच्या या कठीणकाळातून त्यांना  बाहेर काढुया..कारण माणसांच्या वेदनेला एक माणूसच फुंकर घालू शकतो.अंगठ्याला ठेच लागली तर डोळ्यांतून पाणी येतं.तशी आपली मानवजात अखंड आहे.नियतीने किशोरजींच्या कुटूंबावर वर्मी घाव घातलेला आहे.पण त्याची वेदना आमच्याही हृदयात ठसठसते आहे.म्हणून त्या करुणारुपी अंतःकरणाने आपण त्यांचा थोडा भार हलका करूया.
दत्ता हलगीसकर म्हणतात...
ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत..
ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी गावीत
आभाळाएवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे
मातीत मळले जीवन ज्यांचे त्यांना उचलून वर घ्यावे.

मला आशा आहे अशाप्रकारे आपल्या दातृत्वातून या शिक्षकबंधूला पुढे नव्या ऊर्जेने लढण्यासाठी भक्कम आधार मिळेल...आपल्या चांगुलपणातून किशोरजींना जगण्याची नवी उभारी मिळू शकेल.तर चला आपली ही मदत या कुटुंबासाठी लाखमोलाची आहे.
जय हो मंगल हो..!!
                                                                                                         - किरण सुभाष चव्हाण (कोल्हापूर)
                                                                                              मोबा - ८८०६७३७५२८


मदतीसाठी संपर्क...
किशोर निंबा पाटील,मोबा-9096903612
रा-करणखेडा, ता-अमळनेर, जि-जळगांव.
स्टेट बँक ऑफ इंडिया, अमळनेर ब्रँच,
अकाऊंट न,-31524810578
Ifsc Code-SBIN0000309

Comments