कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ९९ जणांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार


ज्ञानवर्धिनी फाउंडेशन व विवेकानंद वाचनालयाचा उपक्रम

अमळनेर : तालुक्यातील चौबारी येथे ज्ञानवर्धिनी फाउंडेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, मारवड आणि विवेकानंद वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ९९ जणांची डॉ. राजेंद्र पाटील (मुंबई) आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, मारवड यांच्याकडून आरोग्य तपासणी करुन कोरोनासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
लॉकडाऊन जरी सुरु आहे, तरी अनेक कामगार सर्वत्र आपापल्या गावी परत आले आहेत. चौबारीतही सुमारे ७५ ते ८० जण परराज्यातून मुळगावी परत आल्यानंतर त्यांना गावातच कॉरंटाईन करण्यात आले होते. ह्या लोकांची सुरुवातीला वैद्यकिय तपासणी करण्यात आली होती, मात्र प्रत्येकाला गावात येऊन १२ ते १५ दिवस झाले आहेत. त्यांना कोरोना व्हायरसची काही लक्षणे आढळत तर नाही ना, याच अनुशंघाने बुधवारी, २० मे रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे यांच्या मार्गदर्शनाने प्राथमिक आरोग्य केंद्र, मारवडचे वैद्यकिय अधिकारी डॉ. आदित्य पाटील यांची टीम समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश पाटील, आरोग्य सेवक दीपक पाटील, सुवर्णा धनगर, गट प्रवर्तक आशा पाटील आदींनी सर्वांची पुन्हा आरोग्य तपासणी केली आणि ज्ञानवर्धिनी फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र मोरे तसेच विवेकानंंद वाचनालयाचे संचालक संजय पाटील यांनी कोरोनाविषयक मार्गदर्शन केले. शिवाय गावात बऱ्याचजणांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी असा त्रास होत होता, मात्र सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्याने सदर रुग्ण तालुक्याच्या ठिकाणी उपचारासाठी जाऊ शकत नाही. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अशा रुग्णांचीही या वैदयकिय सुविधेत शासकिय नियमानुसार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आरोग्य तपासणी करुन औषधोपचार करण्यात आला. यावेळी सरपंच मालुबाई कढरे, उपसरपंच अधिकराव पाटील, ग्रामसेवक नितिन मराठे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी आशा सेविका मिनाबाई दिनेश पाटील, भारती भगवान पाटील, अंगणवाडी सेविका मिनाबाई पाटील, मंगलाबाई कढरे आंदीनी सहकार्य केले.

Comments