ज्ञानवर्धिनी फाउंडेशनतर्फे आर्सेनिक अलबम गोळ्यांचे मोफत वाटप

उपक्रम : चौबारीतील ४५० कुटुंबानी घेतला लाभ 

अमळनेर : तालुक्यातील चौबारी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ज्ञानवर्धिनी फाउंडेशन आणि काबरा फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेल्या आर्सेनिक अलबम या होमियोपॅथी गोळ्यांचे २३ रोजी मोफत वाटप करण्यात आले.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. शिवाय कोरोना व्हायरसने ग्राामीण भागातही प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमिवर चौबारीकरांची रोगप्रतिकारकशक्ती अबाधित राहावी, म्हणून ज्ञानवर्धिनी फाउंडेशन आणि काबरा फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच धुळे शहर गट प्रमुख सागर निकम यांच्या सहकार्याने संपूर्ण गावात आर्सेनिक अलबम गोळ्यांचे वाटप करण्यात आले. नव्या गावातील सुमारे ३०० कुटुंबांना ज्ञानवर्धिनी फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी तर जुन्या गावातील १५० कुटुंबांना धुळे शहर गट प्रमुख सागर निकम यांनी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला या गोळ्या उपलब्ध करुन दिल्या. तसेच एम.एस.पाटील सरांनी लाउड स्पिकरच्या साह्याने गोळ्यांचे सेवन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले.  यावेळी उपसरपंच अधिकराव पाटील, माजी पोलीस पाटील सुधाकर पवार, शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील, मधुकर भास्कर पाटील, एम.एस.पाटील, ग्रा.प. सदस्य गोकूळ पाटील, यशवंत कढरे, भटू पाटील आदी उपस्थित होते.

Comments